लोणी काळभोर -सोशल मीडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या तीन अल्पवयीन बालकांसह नऊ जणांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी दिली.
तेजस संजय बधे (वय 19), उदय सिद्धार्थ कांबळे (वय 19), प्रसाद ऊर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय 19, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय 20, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय 28, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय. 43, रा. वानवडी, पुणे) तसेच आणखी तीन अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाईचा करण्याचे आदेश दिले आहेत. र पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मिडिया वर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारे तसेच कोयता जवळ बाळगणारे व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात लोणीकाळभोर, हडपसर या पोलीस ठाण्यामध्ये भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत.
श्याम जाधव याच्या ताब्यात लोखंडी पात्याचे कोयते मिळून आल्याने त्यांना पुढील तपासकामी हडपसर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या कोयता घेउन दहशत पसरविण्याचे प्रकार सुरू असून त्यात अल्पवयीन बालकांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून आले आहे. म्हणून याची गंभीर दखल घेऊन यापुढे अल्पवयीन बालकांवर देखील कडक कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे, अशी माहिती निर्मल यांनी दिली.