पिंपळे जगतापला यात्रेच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ
शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी आज (मंगळवारी) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात आपल्या स्वतःच्या घरची कार व बंगला पेटवून देत गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेला. शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवली.
प्रज्योत कांतीलाल तांबे असे या युवकाचे नाव असून, त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई-वडील वाजेवाडीमध्ये गेलेले असताना प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली कार (एमएच 12 एजी 9418) पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लागली. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरूनाना वाजे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कारचे चारही टायर तसेच सिलेंडरने स्फोट घेतला. यावेळी प्रकाश गायकवाड, कचरूनाना वाजे, वैभव दरेकर, प्रकाश वाजे, रवी वाजे, गजानन गायकवाड, काळूराम बोत्रे, संदीप जगताप यांसह आदींनी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली; मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही चीज वस्तू जळून खाक झाल्या.
दरम्यान जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी तेथे जात प्रज्योत याला ताब्यात घेतले. याबाबत कांतीलाल बाळासाहेब तांबे (वय 48) यांनी फिर्याद दिली.
यात्रेच्या दिवशीच घडला प्रकार
पिंपळे जगताप गावची कालपासून यात्रा सुरु यात्रेमुळे पाहुणे घरी येत असतात; मात्र ऐन यात्रेच्या दिवशीच गावामध्ये या युवकाने स्वतःचा बंगला आणि कार पेटवून दिल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.