बारामती -बारामती नगरपरिषद शारदा प्रांगण समोरील नगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये होत असलेल्या बेकादेशीर बांधकामाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना दिले. शारदा प्रांगण येथे राष्ट्रवादीचे शहर कार्यालय पाडून नवीन कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
त्यानुसार या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शारदा प्रांगण येथे अनेक वर्षांपासून शहर राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या डागडुजीची परवानगी नगर परिषदेकडे मागितली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली . जुनी इमारत दुरुस्त करणे ऐवजी नवीन बांधकाम सुरू करण्यात आले. नवीन बांधकामास कोणती परवानगी नाही. शारदा प्रांगण हे शाळेचे मैदान आहे.
मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर नियमांचा व शर्तींचा भंग करून बेकायदा इमारत उभी राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत नगरपरिषद, जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे जिल्हाधिकारी यांनी बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तरी बांधकाम सुरू आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे फैयाज शेख यांनी सांगितले.