वाघोली -एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने लोणीकंद उपकेंद्रातील आकस्मिक दुरुस्ती कामामुळे वाघोलीमधील सुमारे 9 हजार 500 वीजग्राहकांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, महावितरणने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत सोमवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत केला.
वाघोली परिसराला 22 केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. उपकेंद्राला महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामधून महावितरणच्या वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र, (दि.26) सकाळी 11 च्या सुमारास वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे पर्यायी ताबडतोब वीजपुरवठा सुरू केला.
मात्र, दुपारनंतर महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये तातडीचे आकस्मिक दुरूस्तीचे काम निघाले. ते करणे गरजेचे असल्याने सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत या अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वाघेश्वर, संघार व करोला-2 या तिनही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तीनही वाहिन्यांचा पुरवठा सुरू केला.
या परिसराचा पुरवठा होता बंद…
वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोड, साईसत्यम पार्क, रेणुका पार्क, दाभाडे वस्ती, बायफ रस्ता, डोमखेल वस्ती परिसरातील 9 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत बंद ठेवला. वाघेश्वर व करोला-2 या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरात रात्री 08:30 वाजेपासून वीजपुरवठा पुन्हा बंद झाला. सर्व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी वीजपुरवठा पूर्ववत केला.