सातारा – साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला बारा तासांच्या आत पकडण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने अपघात करून पलून गेलेले वाहन व वाहन चालक यांना पोलीस ठाण्यात आणले. पुणे- बंगळुरू महामार्गावर शहराजवळील लिंबखिंड परिसरात शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झालेल्या अपघातात लिंब (ता. सातारा) येथील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ बाबू खादगे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अपघात करून गेलेल्या वाहनाच्या शोधासाठी संपूर्ण निलेश तांबे यांनी यंत्रणा कामाला लावली. घटनास्थळापासून एक्सप्रेस हायवेपर्यंत प्रमुख ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. यातून अपघात करून जाणाऱ्या वाहनाची ओळख पटली. तो ट्रक सीएनजी गॅसचा पुरवठा करणारा तामिळनाडू पासिंगचा (टीएन ८८ के १२८२) होता. लिंब येथे शुक्रवारी रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच पुण्याजवळ महामार्गावर पोलिसांनी हा मालट्रक पकडून वाहनचालक कुवरबहादूर नवलकिशोर सिंग (वय २६, अमोर, कानपूर, उत्तर प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. पहाटे सव्वाचारच्या दरम्यान वाहन व वाहन चालकाला तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे, उपनिरीक्षक सोनू शिंदे, हवालदार शिवाजी डफळे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.