सविंदणे -शिरूर पंचायत समितीच्या आवारातील मोठमोठी वडाची झाडे मध्यरात्रीच्या सुमारास “रात्रीस खेळ चाले…’ या उक्तीप्रमाणे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विनापरवाना तोडून त्याची गाडीतून नेऊन विल्हेवाट लावली आहे. ही झाडे बेकायदा तोडून चोरी केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नाथाभाऊ पाचर्णे यांनी निवेदनाद्वारे शिरूर नगर परिषद, शिरूर तहसिलदार, शिरूर पोलिसांकडे केली आहे.
शिरुर पंचायत समितीच्या आवारात सुशोभीकरणाच्या नावाखाली जुन्या सुमारे 80 ते 90 वर्षे वयाची दोन झाडे तसेच इतरही चार ते पाच झाडांची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता कत्तल करण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई आणि कर्मचारी यशवंत वाटमारे यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या ठिकाणी नगर परिषदेने पंचनामा केला आहे. 15 दिवस उलटूनही नगर परिषद मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्याकडून कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नाथाभाऊ पाचर्णे यांनी केला आहे.
5 मार्चच्या मध्यरात्री 11:45च्या सुमारास शिरूर पंचायत समितीच्या आवारात सुमारे 80 ते 90 वर्षे वडाच्या झाडांची कत्तल सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांना याबाबत माहिती मिळाली. पाचर्णे यांनी पाहणी केली असता त्याठिकाणी गटविकास अधिकारी अजित देसाई आणि यशवंत वाटमारे हे उपस्थित होते. नाथा पाचर्णे यांनी संबंधित घटनेचे व्हिडिओ शूटिंग काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी पाचर्णे यांच्या अंगावर धावून जात त्यांचा मोबाईल हिसकाविन्याचा प्रयत्न केला. या विषयी गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्याशी संपर्क साधला असता मी सध्या कामात असून या विषयी मी नंतर फोन करतो, असे उत्तर दिले आहे.