पुणे -राज्य सरकारचे अल्प मानधनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील दोन लाखांवर अंगणवाडी सेविका, मदतनीस उद्यापासून (दि.20) बेमुदत संप करणार आहेत. तसेच, सोमवारी सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून वेतन हक्क मोर्चा काढण्यात येणार आहे.
अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्रच्या पुणे शाखेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी ही माहिती दिली. पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळते. गेली अनेक वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने अंगणवाडीताईंचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन देऊन प्रजासत्ताकदिनाची तारीखही जाहीर केली होती.
मात्र, त्यांनी शब्द न पाळल्याने हा संप होणार आहे. अंगणवाडी केंद्राचे भाडेही गेल्या वर्षापासून राज्य सरकारकडून न मिळाल्याने अंगणवाड्या बंद करण्याचा तगादा जागामालक लावत आहेत. ते टाळण्यासाठी अनेक अंगणवाडी ताईंनी कर्ज घेऊन संबंधितांचे भाडे देऊन जागा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, मध्यप्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांतही अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्रापेक्षा अधिक मानधन मिळते.