पुणे -गेल्या दोन दशकांत शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरिकरणाचा ताण नैसर्गिक साधन संपत्तीवर येत आहे. त्यात प्रामुख्याने शहरासाठीची पाण्याची उलब्धता हा भविष्यात कळीचा मुद्दा ठरणार असल्याने आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह, पावसाचा प्रत्येक थेंब अडवून आणि जिरवून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यास भविष्यात पाण्याची नैसर्गिक उपलब्धता वाढणार आहे.
हीच बाब लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि भूजल सर्वेक्षण विभाग एकत्रितपणे पुढे असून पुणे महापालिका भूजल समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या या समितीत भूजल सर्वेक्षण विभाग, महापालिका, भूजल संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महापालिकेचा पथ, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभाग असे एकूण 22 सदस्य आहेत. या समितीच्या माध्यमातून शहराचा भूजल आराखडा तयार केला जाणार आहे. शहरी व औद्योगिक भागातील विंधन विहिरी व विहिरींची माहिती संकलन करणे, भूजल नकाशे तयार करणे, भूजल नकाशांसोबतच पाऊस पाणी संकलन योजना राबविणे, भूजल उपशावर नियंत्रण, भूजल साठ्यांचे प्रदूषण रोखणे, वरिल सर्व विषयांशी संबंधित माहितीचे संकलन करून त्याचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करणे, यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या कामकाजाची सर्व जबाबदारी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे असणार आहे. तत्कालीन महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या माध्यमातून खासगी स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शहरात भूजल पुनर्भरण प्रकल्पास सुरूवात केली होती.
पहिल्या टप्प्यात दोन भागांची निवड
या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शहराच्या भूजल व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील एक पेठ तसेच नव्याने विकसित होणारा भाग निश्चित केला जाणार आहे. त्यात, संबंधित भागात पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत किती आहेत. विहिरी, विंधन विहिरी नेमक्या किती आहेत, या जलस्रोताचा वापर कशासाठी केला जातो, किती पाणी उपसले जाते. हे पाणी कोणत्या कारणांसाठी वापरले जाते. हे जलस्रोत प्रदूषित झाले आहेत का? असतील तर कशामुळे, त्यांचे जल पुनर्भरण कसे केले जाते. याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. त्या आधारावर शहराच्या इतर भागातही अशा प्रकारचे सर्वेक्षण आणि माहिती संकलन करून त्या आधारे शहराचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे.