शिक्रापूर -येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धूलिवंदनदिनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली आहे. शिक्रापूर येथील हद्दीमध्ये दारु पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी अनोख्या पद्धतीने कारवाई करीत मोहीम हाती घेतली होती.
सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, हवालदार श्रीमंत होनमाने, मिलिंद देवरे, पोलीस शिपाई अंबादास थोरे, जयराज देवकर, किशोर शिवणकर यांनी पुणे नगर महामार्गावर दारु पिऊन वाहने चालवणाऱ्या संशयित वाहन चालकांची अल्को व्हिसर या अल्कोहोल तपासणी यंत्राच्या माध्यमातून तपासणी केली.
यावेळी दारु पिऊन आढळून आलेल्या दुचाकीचालकांची वैद्यकीय तपासणी केली. वीस जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांची वाहने पोलीस स्टेशन येथे जमा करुन घेतली आहेत. महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी ही मोहीम कायम राबवणार असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.