सर्व कुटुबियांना समान हक्क, हिस्सा आणि ताबा मिळणार
पुणे – जर्मन बेकरीसह इतर मिळकतींच्या मालकी हक्कांबाबत गेल्या 21 वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर निकाली लागला आहे. खरोसे कुटुंबातील इतरांना मालकी हक्क, कायम स्वरुपी ताबा, हिस्सा, विभागणी करून मिळावा, असा आदेश न्यायालयाने केला. दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश क्रांती पिंगळे यांनी हा निकाल दिला.
याबाबत एप्रिल 2000 मध्ये लक्ष्मी नारायण खरोसे (वय 60, रा. कोरगाव पार्क) संपत्ती वाटणी, विभागणी, ताबा, कायम स्वरुपी मनाई आणि त्रयस्थ व्यक्तींनी हक्क प्रस्थापित करून नये, असा कायमस्वरूपी मनाईनचा दावा दाखल केला. स्मिता ज्ञानेश्वर खरोसे आणि रंजना खरोसे, मुलगा शंकर आणि राम (आता मृत), राम यांचा मुलगा मनोज, नातेवाईक नीतू जाधव, दर्शना भोसले, कुसुम भोसले, कृष्णा पवार, रुक्मिणी बांदल, उधाने-शेवाळे इंटरप्राईझ (जे बेकरी चालवत होते), राजन उधाने, विजय शेवाळे, शेवाळे यांची पत्नी लक्ष्मी, शेवाळे यांचा मुलगा विक्रम आणि कामिनी तावरे यांना त्यात प्रतिवादी करण्यात आले होते.
लक्ष्मी यांच्या मुलगा ज्ञानेश्वर खरोसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी स्मिता यांनी संपत्तीचा ताबा घेतला, असे दाव्यात नमूद होते. तर जर्मन बेकरीची संपत्ती एका करारानुसार उडाणे आणि शेवाळे यांना चालविण्यासाठी देण्यात आली होती.
स्मिता खरोसे वगळता इतर प्रतिवादींना संपत्ती वडिलोपार्जित असल्याचे नमूद करीत त्यात हिस्सा मागितला होता. या प्रकरणात स्मिता खरोसे वगळता इतर प्रतिवादींच्या वतीने ऍड.. सुदीप केंजळकर यांनी कामकाज पाहिले. तर लक्ष्मी खरोसे यांच्यावतीने ऍड. मर्झबान इराणी यांनी बाजू मांडली.