पुणे – पतीसोबत कारमधून जेवण्यासाठी निघालेल्या वकील महिलेसह तिच्या पतीवर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव बुद्रुक येथे घडला. याप्रकरणी तडीपार गावगुंडासह तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने काही तासांच्या आतच बेड्या ठोकल्या आहेत.
सराईत रितेश विजय कोंढरे ( लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), निलेश श्रीमंत थोरात (20, रा. मोरेवस्ती, पदमावती) आणि ओकांर सुरेश तांबे (28, मोरेवस्ती, रांका ज्वेलर्सजवळ, पदमावती) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत ऍड. त्रिवेणी अतुल रूपटक्के (28, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणी रूपटक्के ह्या वकील व्यवसाय करतात त्या रविवारी त्यांचे पती अतुल रूपट्टक्के याच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असताना त्याच्या कारला सराईत रितेश कोंढरे चालवत असलेली कार घासून गेली. त्यावेळी अतुल यांनी त्यांची कार कोंढरेच्या कारच्या मागे घेतली.
पुढे जाऊन ही कार आंबेगाव बुद्रुक येथील शिवाजी मित्र मंडळा समोरी अनिल कोंढरे यांच्या कार्यालयासमोर जाऊन थांबली. यावेळी कारमधून तिघेजण खाली उतरले. अतुल यांच्या ओळखीचा आरोपी रितेश कोंढरे याला अतुल यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत गाडी येवढी घासली म्हणून काय झाले म्हणत तुला माहित आहे का मी कोण आहे अशी धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी आरोपी रितेश आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी कामधुन लोखंडी कोयता काढून अतुल यांच्या अंगावर उगारला. तेवढ्यात फिर्यादी त्रिवेणी रूपटक्के मध्ये पडल्याने त्यांच्या हातावर कोयत्याचे वार झाले. जखमेतून रक्तस्त्राव होत असताना रितेश यांनी त्रिवेणी त्रिवेणी यांना बाजुला ओढले. यातच त्यांचे मंगळसुत्र तुटून पडले. त्यानंतर रितेशच्या साथीदारांनी कारमधून बॅट काढून अतुल आणि त्रिवेणी यांना मारहाण केली.
गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर गुन्हे निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धिरज गुप्ता पोलिस अमंलदार रविंद्र भोसले,रविंद, चिप्पा, सचिन पवार , निलेश खोमणे, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदिश खेडेकर आणी शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने तिघांना आठ तासांच्या आत ताब्यात घेत अटक केली.