पुणे- जर्मनीतील बर्लिन येथील “ग्रिप्स थिएटर’ ही लहान मुले आणि तरुणांसाठी काम करणारी मुक्त रंगभूमी म्हणून ओळखली जाते. याच संकल्पनेवर आधारित मराठी नाटके पुण्यात पाहता येणार आहेत. “रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन’ आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ऍक्टिव्हिटी रीसर्च अँड टेक्नोलॉजी (स्मार्ट) या संस्थांच्या वतीने 7 ते 22 मे या कालावधीत “ग्रिप्स नाट्यमहोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवात 6 ते 14 वयोगटातील मुलांना नाटक आणि विविध उपक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील आवारात महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा फाउंडेशनचे श्रीरंग गोडबोले यांनी केली. यावेळी अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका विभावरी देशपांडे, स्मार्टच्या संचालक राधिका इंगळे, फाउंडेशनचे हृषिकेश देशपांडे उपस्थित होते.
महोत्सवात 4 नाटकांचे प्रत्येकी 4 प्रयोग होणार आहेत. श्रीरंग गोडबोले यांनी 1986 मध्ये जर्मन लेखकासोबत सहलेखन आणि सहदिग्दर्शन केलेले “छान छोटे, वाईट्ट मोठे’ नाटक आहे. यासह कुटुंबातील स्त्रियांचे स्थान या विषयावर आधारित “नको रे बाबा’ हे नाटक देखील पाहता येणार आहे, “प्रोजेक्ट अदिती’ आणि बाल लैंगिक शोषण या विषयावर प्रकाश टाकणारे “एकदा काय झाले’ हे नाटक सादर होणार असल्याची माहिती विभावरी देशपांडे यांनी दिली.
नाटकांव्यतिरिक्त अभिनय, नृत्य, कठपुतळी, बोलक्या बाहुल्या आणि चित्रपट निर्मिती या विषयांवर कार्यशाळा होणार असून, मनोरंजन आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सामान्यांना माहिती नसलेल्या मात्र शहरातील महत्त्वाच्या असलेल्या विविध ठिकाणी हेरिटेज वॉक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. अनिल अवचट लिखित “पुण्याची अपूर्वाई’ या पुस्तकावर आधारित हे हेरिटेज वॉक असेल, असे इंगळे म्हणाल्या.