पुणे -मुळशी तालुक्यातील गोड आणि रसाळ गावरान हापूसची आवक मार्केटयार्डमधील फळबाजारात सुरू झाली आहे. चक्रीवादळाचा गावरान हापूसला मोठा फटका बसला असून फळांचे नुकसान झाले आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील फळबाजारात शुक्रवारी (दि.21 मे) गावरान हापूसचे अकरा क्रेट्स (प्लॅस्टिक जाळी) मुळशी तालुक्यातील बेलावडे गावातून विक्रीसाठी पाठविण्यात आले. घाऊक बाजारात गावरान हापूसची प्रति डझन 250 रुपये आणि पायरीची 200 रुपये डझन या भावाने विक्री करण्यात आली. गावरान हापूस नैसर्गिकरित्या पीकवलेला असतो. त्यामुळे त्याची गोडीही चांगली असते.
वटपौर्णिमेला पूजनासाठी गावरान हापूसला चांगली मागणी असते, अशी माहिती गावरान हापूसचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे गावरान हापूसचे मोठे नुकसान झाले आहे. गावरान हापूसची लागवड मुळशी, भोर आणि वेल्हा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.
गावरान हापूसची हंगामातील पहिलीच आवक शुक्रवारी बाजारात झाली. किरकोळ बाजारात एक डझन गावरान हापूसला 400 रुपये आणि पायरीला 300 रुपये असा भाव मिळाला, असे कोंडे यांनी सांगितले.
यंदा निम्मीच आवक होण्याची शक्यता?
15 मेनंतर गावरान हापूसची आवक बाजारात सुरू होते.
25 जूनपर्यंत ती सुरू असते. चार दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे झाडावर लगडलेल्या फळांचे नुकसान झाले आहे. जवळपास 50 टक्के फळे खराब झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात गावरान हापूसची अपेक्षेएवढी आवक होणार नाही. निम्मीच आवक होण्याचा अंदाज यशवंत कोंडे यांनी वर्तविला आहे.
=============