कचरावेचकांच्या मुलांना थकित शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
पुणे – कचरावेचकांच्या मुलांची गेल्या ३ वर्षांपासूनची थकित शिष्यवृत्ती ३१ डिसेंबरपर्यंत मिळावी यासाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कचरावेचकांचा साधारणत: वार्षिक कमाईतील १० ते ४० हजार रुपये इतका खर्च हा शिक्षणावर होतो. कचरावेचक हा खर्च उचलण्यासाठी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काम करत असतात कारण आपल्या मुलांना आपल्यासारखे कचऱ्यात काम करावे लागू नये. त्यांनी शिकून मोठे अधिकारी व्हावे. पाहिजे तो व्यवसाय करता यावा याकरिता शिष्यवृत्ती मिळणे गरजेचे असते.
देशातील कचरावेचक व संघटनांनी लढून स्वच्छतेच्या कामातील व्यक्तींच्या मुलांकरिता मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळवली. या योजनेअंतर्गत वार्षिक ३ हजार रुपये लाभ मिळतो. याचा लाभ घेण्यासाठी सर्व नियम आणि कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित कार्यालयामध्ये अर्ज जमा केले असूनही २ हजार ५७९ मुलांना गेल्या ३ वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नसून ही थकीत रक्कम आजमितीला ७७ लाख ३७ हजारांच्या पुढे गेली आहे. शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अध्यक्ष सुरेखा गाडे, चिटणीस आदित्य व्यास यांच्या नेतृत्वाखाली कचरावेचकांनी मुलांसह भिडेवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला.
शिष्यवृत्तीला एवढा उशीर का? त्यांनी शिक्षण कसे सुरू ठेवायचे? त्यांनी आपल्या भविष्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांचे काय होणार?” असे प्रश्न कचरावेचकांनी उपस्थित केला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या मुलाच्या शिष्यवृत्ती तरतूद करून शिष्यवृत्ती तात्काळ खात्यात जमा करावी. शाळेत आणि सरकारी पत्रव्यवहारात “अस्वच्छ शिष्यवृत्ती” ऐवजी साफ सफाई क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृती वापरावे. महिन्याभरात प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.