पुणे : वैद्यकीय महाविद्यालय असलेले कर्नाटक येथील शैक्षणिक संकुल विकत देण्याच्या अमिषाने बनावट सामंजस्य करार (एमओई) करून 2 कोटी 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी धारवाड येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक केली आहे. त्याचे वडील महादेव रामचंद्र देशमुख, लक्ष्मण यंकप्पा आरमाणी, दिलीप सदाशिव चव्हाण या तिघांवर गुन्हा दाखल आहे.
फिर्यादीच्य वतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांचे मार्फत पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान संजोग याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील वादग्रस्त दस्तऐवज, फसवणूक केलेली रक्कम जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील रेणूका देशपांडे-कर्जतकर यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.पी.शेळके यांनी 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
महादेव देशमुख याला फसवणूक प्रकरणात ईडीने अटक केली आहे. तो मार्च 2022 पासून जेलमध्ये आहे. फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत ही घटना घडली. करोनामुळे शैक्षणिक संकुल अडचणीत आले आहे. कर्मचारी पगार, लाईट बिलासाठी ही रक्कम घेण्यात आली होती. ही रक्कम खरेदीच्या रक्कमेतून वजा करणार असल्याचे सांगण्यात आले होते.