पुणे – शहरात मागील १२ वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४ बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. बुधवार पेठेत शनिवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मासुका कलाम फकीर ऊर्फ शेख (२५, रा. बुधवार पेठ, मूळ. रा. बांगलादेश), पिया नाझ्मुल सरदार ऊर्फ शेख (२७, बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश), रुजी हारून शेख (३८, रा. बांगलादेश), रूपा आकाश मंडोल (४०, रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावे आहेत. आरोपी महिला या मागील १२ वर्षांपासून बुधवार पेठेतील लिंगप्पा महांकाळे यांचा जुना वाडा येथे शिवा कांबळे यांच्या ताब्यातील तळमजल्यावरील खोलीत राहात होत्या.
बुधवार पेठ भागातील वेश्यावस्तीत कुटंणखाण्यात बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर यांना मिळाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शनिवारी बुधवार पेठ भागात छापा टाकला.
येथून ९ महिलांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ४ महिला या बांगलादेशातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बांगलादेशी महिलांकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडे वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
….इतर पाच महिलांवर गुन्हा
वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यावर उभे राहून अश्लील हावभाव व हातवारे करून सार्वजनिक ठिकाणी ये- जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा केल्याप्रकरणी ५ महिलांना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.