पुणे – महापालिका सभागृहाची मुदत संपत आली होती. तरीही नगरसेवकांच्या आग्रहाखातर आणि कर्मचारी नसतानाही महापालिकेने
5 अग्निशमन केंद्र सुरू केली. मात्र, पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी उद्घाटनानंतर ती बंद करावी लागली. आता ती पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यासाठी 200 कर्मचाऱ्यांची ठेकेदारी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. याबातची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेने सिंहगड रस्ता (नांदेड फाटा जवळ), बी.टी. कवडे रस्ता, वारजे, धानोरी रस्ता तसेच गंगाधाम उभारलेल्या अग्निशमन केंद्राची उद्घाटने केली. या केंद्रांसाठी अग्निशमन दलाकडे आवश्यक मनुष्यबळ नाही. त्यामुळे ही केंद्र बंद आहेत. अथवा पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे या केंद्रांसाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. मात्र, हे 200 कर्मचारी केवळ याच केंद्रांसाठी न देता त्यातील काही कर्मचारी शहरातील इतर 14 ठिकाणी असलेल्या केंद्रांसाठीही नियुक्त केले जाणार आहेत. या 14 केंद्रांवर सध्या 380 कर्मचारी कार्यरत असून तीन शिफ्टमध्ये ते विभागले गेले आहेत. त्यातही सुमारे 50 चालक असून 10 ते 15 अटेंडंट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 310 ते 320 कर्मचारीच असून त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे, ठेकेदारी पद्धतीने घेण्यात येणारे काही कर्मचारी इतर 14 केंद्रांवरही नियुक्त केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
गरज 1,600 ची मान्यता 900 ची प्रत्यक्षात 380 कार्यरत
शहराच्या लोकसंख्येचा विचार करता महापालिकेस संपूर्ण शहरासाठी सुमारे 74 अग्निशमन केंद्रांची गरज आहे. पण प्रत्यक्षात 14 केंद्र कार्यरत असून त्यात आणखी 5 केंद्रांची भर पडणार आहे. तर, 74 केंद्रांसाठी 1,600 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून शासनाने 2014 मध्ये या विभागासाठी विद्यमान कार्यरतपदांसह 910 पदांची मान्यता दिली आहे. मात्र, ही पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली सेवा प्रवेश नियमावली गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पडून असल्याने केवळ 380 कर्मचारीच कार्यरत असून त्यातही 50 चालक आणि 10 ते 15 फायर अटेंडेंट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 320 ते 325 कर्मचारीच शहरात कार्यरत आहेत.