कोथरूड – चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याआधी चौकात मोठ-मोठे होर्डिंगचे सांगाडे उभे राहिले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी हे होर्डिंग उभारले आहेत ते धोकादायक असून नियमांचे उल्लंघन करीत होर्डिंग उभारणाऱ्यांना कोणाचा “राजाश्रय’ आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
रस्त्याकडेला असलेले होर्डिंग पडून अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. बेकायदा तसेच तांत्रिक चुकांमधून उभारलेल्या होर्डिंगवर पैसा कमवणारे आणि प्रसिध्दी करणारे अपघातानंतर नामानिराळे राहून त्यात सामान्य नागरिकांचा जीव जात आहे. कुंभार वाडा येथील होर्डिंग दुर्घटना असो की पिंपरी-चिंचवडमधील दुर्घटना यात रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचाच बळी गेला आहे. घटना घडल्यावर तात्पुरती कारवाई होते. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे, अशीच स्थिती चांदणी चौकात दिसून येते आहे.
चांदणी चौकाचे रूंदीकरण झाले, नवीन उड्डाणपूल उभा राहिला. मात्र, जेवढे उड्डाणपूल आहेत, त्याच्या दुप्पट होर्डिंगची संख्या वाढली आहे. हे होर्डिंग मंजुरी घेऊनही उभारले असले तरी बहुतांश होर्डिंग रस्त्यालगत धोकादायक स्थितीत आहेत. कोथरूडकडून मुळशीकडे किंवा बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोठे होर्डिंग उभे असून या अवाढव्य होडिंगमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात धडकीच भरते. हे होर्डिंग सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चांदणी चौकात उद्या (दि.12) उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. यापार्श्वभूमीवर रस्त्यालगतचे हे लोखंडी सांगाडे विद्रूप दिसत आहेत त्यामुळे ते झाकावेत किंवा त्यावर योग्य जनजागृतीपर संदेश असलेले फ्लेक्स, जाहिराती लावाव्यात, अशी सूचना नागरिक करीत आहेत.
होर्डिंग मालकास नोटीस…
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडून संबधित होर्डिंग मालकाला नोटीस देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबधित होर्डिंग सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. अन्यथा पूर्व मान्यता रद्द करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार हे होर्डिंग काढून नियमानुसार उभारण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.