सातारा – मुंबईहून दरे (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावी दोन दिवस मुक्कामी निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते गुरुवारीरुमुंबईत राजभवनाच्या आवारातील हेलिपॅडवर तातडीने उतरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते दरे गावाकडे निघाले; परंतु महाबळेश्वर तालुक्यातील खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर साताऱ्याकडे आणण्यात आले. सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. तेथून मुख्यमंत्री शिंदे हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दरे या मूळ गावी निघाले. त्यांच्या हेलिकॉप्टरने गुरुवारी सकाळी मुंबईतून “टेक ऑफ’ केले. साधारण वीस मिनिटांनी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, ते पुन्हा तातडीने राजभवन परिसरातील हेलिपॅडवर उतरविण्यात आले.
त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे हे महाबळेश्वरकडे रवाना झाले; परंतु तेथील खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सातारला आणण्यात आले. येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर ते उतरवण्यात आले. मुख्यमंत्री साताऱ्यात येणार असल्याचे समजताच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलीस अधिकारी सैनिक स्कूलच्या हेलिपॅडकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांच्या पुढील प्रवासासाठी वाहनांचा ताफाही तैनात ठेवण्यात आला. हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडा वेळ शासकीय विश्रामगृहात थांबले.