पुणे – मगरपट्टा चौक ते गाडीतळ पदपथावर अतिक्रमण

अधिकृत दुकानदार त्रस्त : पथारी, हातगाडी, फेरीवाले व टेम्पोचालकांची दादागिरी

हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौक ते गाडीतळ दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक व पादचारी मार्गावर पथारी, हातगाडी, फेरीवाले व टेम्पोंनी अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडीबरोबरच अधिकृत व्यावसायिकांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. मात्र, पालिका प्रशासन त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे व्यावसायिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मगरपट्टा चौक ते गाडीतळ हा मोठा वर्दळीचा रस्ता आहे. त्यातच पुलामुळे रस्त्याचे दोन भागात विभाजन झाले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अधिकृत व्यावसायिकांच्या व्यवसायात अधिच अडचण येत आहे. त्यातच गेली काही वर्षापासून अधिकृत दुकाने, सायकल ट्रॅक, फुटपाथ आणि रस्त्याच्या पाव भागापर्यंत अनधिकृतपणे पथारी, हातगाडी, फेरीवाले यांनी अतिक्रमण करत व्यवसाय थाटले आहेत. याशिवाय भरीसभर म्हणून येथे टेम्पोही पार्किंग केले जात आहेत.

याशिवाय रस्त्यावरच भाजी मंडई भरविली जात आहे. हे सर्व अडथळे पार करून ग्राहक आमच्या दुकानात कसे येणार असा सवाल येथील व्यावसायिकांनी उपस्थित केला असून, पालिका प्रशासनाने रस्त्यावर, सायकल ट्रॅक, फुटपाथ तसेच अधिकृत व्यावसायिकांच्या दुकानासमोर, सोसायट्यांच्या समोरील रस्त्यावर तसेच प्रवेशद्वारावर हातगाडी लावून, पथारी असा यावसाय करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी.

तसेच हडपसर उड्डाणपूलाखाली बाजूस व रस्त्यावरच भाजी विक्री व फळविक्री करणारे व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालिकेला व्यवसायाचा रितसर कर भरून आम्ही व्यवसाय करत असताना आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही येथील अतिक्रमणे तशीच ठेवली जात आहेत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना रस्ता द्या, असे सांगितल्यास या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून अधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दम भरला जात आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही हप्ते देतो आमचे कोंणीच काही बिघडवू धकणार नाही, अशी भाषा वापरली जात असल्याचे येथील व्यावसायिकांनी नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.