पुण्यातला न सुटलेला पेच (अग्रलेख)

पुण्यात अजून कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या संयमाचा कळस यावेळी गाठला गेला आहे. हा उशीर का झाला याचे कोडे अजून कोणालाही सुटलेले नाही. भाजप उमेदवार जाहीर होऊन आठवडा होत आला असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली. त्याला प्रतिसाद म्हणून कॉंग्रेसने काल पुण्यात उमेदवाराविनाच प्रचार सुरू केला. कसबा गणपतीला आरती करून प्रचाराची सुरुवात तर झोकात झाली. गर्दीही बऱ्यापैकी होती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहभागही उत्साही होता. कॉंग्रेसचे सर्वच इच्छुक यात सहभागी झाले होते. पण काहींनी या प्रचाराच्या उद्‌घाटन फेरीचे वर्णन “नवरदेवाविना वरात’ असे केले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला झालेला विलंब हा अर्थातच थट्टेचा विषय होणार यात नवल नाही. पुणेकरांनी कुत्सित टोमणे मारून कॉंग्रेसजनांना हैराण केले आहे. पण कॉंग्रेसजन त्याची फारशी फिकीर करताना दिसत नाहीत. त्यांचे सारे पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असते. त्यांच्या विरोधात एक शब्दही काढण्याची हिंमत ते कधीच करीत नाहीत. पण कॉंग्रेस उमेदवार जाहीर होण्यास लागलेल्या विलंबामुळे दिवसेंदिवस पक्षाची लढतीची क्षमता कमी होत जात आहे याची त्यांना फिकीर नसावी याचेच आश्‍चर्य वाटते आहे. आता या विलंबातूनही विधायक अर्थ काढणारे काही जण निघाले.

पुण्याच्या निवडणूक चर्चेचा विषय केवळ कॉंग्रेस उमेदवारावरच केंद्रित राहावा अशी कॉंग्रेसची स्ट्रॅटेजी असावी, असेही सांगितले जाऊ लागले आहे. एका अर्थाने ते खरेही आहे. कारण भाजपचे गिरीश बापट यांच्या प्रचारापेक्षा सारा रोख पुण्यातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण यावर केंद्रित झाला आहे. हे बिन खर्चाचे आणि बिन त्रासाचे नवीन प्रचार तंत्र आहे की काय असेही आता पुणेकरांना वाटू लागले आहे. पुण्याच्या बाबतीत असे सहसा होत नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या वाट्याला आलेला हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि कॉंग्रेसने तो हक्काने मागून घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून इतका हलगर्जीपणा का झाला याचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. कमालीची उत्सुकता ताणून ऐनवेळी वेगळाच उमेदवार जाहीर करण्याचे तंत्र कॉंग्रेस श्रेष्ठी आजमावतात की, पुन्हा त्याच त्या नावांपैकी एकाचे नाव ते जाहीर करतात, हे पाहणे आता औत्सुक्‍याचे ठरले आहे.

पुण्यात या आधी विठ्ठलराव तुपे आणि कलमाडी यांच्यात जी लढत झाली होती त्यावेळीही कॉंग्रेस उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाला होता. कलमाडी कॉंग्रेस सोडून भाजपच्या गोटात सामील झाले होते. भाजपने ही जागा स्वत: न लढवता कलमाडींसाठी मोकळी ठेवली होती. कलमाडींचीही उमेदवारी खूप आधीच जाहीर झाली होती पण कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार ठरत नव्हता. त्यावेळीही पुण्यातल्या कॉंग्रेसजनांवर उमेदवाराविनाच प्रचार सुरू करण्याची वेळ आली होती. पण अल्पावधीत तुपे यांनी प्रचारात बाजी मारून वाजपेयींची लाट असतानाही बलाढ्य सुरेश कलमाडींना चित केले होते. मुळात पुण्यात उमेदवार जाहीर होण्यास कॉंग्रेसकडून जो विलंब झाला याची अनेक कारणे आहेत. पहिले मुख्य कारण म्हणजे पुण्याच्या बाबत कॉंग्रेस हायकमांडपुढे जे रिपोर्ट गेले त्यातून श्रेष्ठींचा गोंधळ वाढवण्याचेच काम झाले. त्यामुळे पुण्यातील स्थितीचा त्यांना अंदाज येईनासा झाला. पुण्यात कॉंग्रेसकडे वडीलकीच्या नात्याने वागणारे नेतृत्वच उरले नाही. ज्यांनी त्यांनी आपापले घोडे पुढे दामटायचा प्रयत्न केला. त्यातूनच हा गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला.

पुण्यातला नेमका अंदाज घेण्यासाठी मग पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांना मुद्दाम पुण्यात पाठवण्यात आले. त्यांना उमेदवारांशी बोलून अहवाल देण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्यानुसार अहवाल दिलाही पण त्या अहवालातूनही पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झालेला पेच सुटू शकला नाही. पुण्यातून नेमका फीडबॅक येईनासा झाल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात श्रेष्ठींनी खासगी सर्वेक्षण संस्थेची मदत घेऊन पुन्हा पुण्याच्या बाबतीत नव्याने अंदाज घेतला असे म्हणतात. आता त्यावर पक्षाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. पुण्याच्या बाबतीत शरद पवार हाही एक महत्त्वाचा फॅक्‍टर मानला जातो. त्यांनी त्यांच्या पसंतीचे नाव श्रेष्ठींपुढे केले; पण तो उमेदवार त्यांनी स्वतःच्या राजकीय खेळीसाठी पुढे केला आहे हे लक्षात यायला कॉंग्रेसश्रेष्ठींना वेळ लागला नसावा. प्रदेश कॉंग्रेसने तीन उमेदवारांची नावे पाठवली. त्यातील एका नावासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही राहिले.

प्रत्येक कोपऱ्यातून वेगळे नाव पुढे केले गेल्याने त्याचा परिणाम या विलंबात झाला आहे, असे मानण्यास जागा आहे. आता या इतक्‍या विलंबानंतर कॉंग्रेस श्रेष्ठी ऐनवेळी कोणते नाव बाहेर काढणार या विषयी साऱ्या महाराष्ट्रभर उत्सुकता निर्माण झाली आहे. आता कसोटी कॉंग्रेस श्रेष्ठींची आहे. इतक्‍या विलंबानंतर, चर्चिल्या गेलेल्या नावांपैकीच एक नाव आले तर डोंगर पोखरून उंदीर काढला अशी पहिली प्रतिक्रिया उमटण्याचा धोका आहे. जर हाच उमेदवार द्यायचा होता तर इतका वेळ कशाला घालवायचा असा प्रश्‍न कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडूनच उपस्थित केला जाण्याची शक्‍यता आहे.

ऐनवेळी चाकोरी बाहेरचा उमेदवार जाहीर करायचा तर उरलेल्या 20-21 दिवसांत त्या नवख्या उमेदवाराला प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार आहे काय? असा प्रश्‍न उभा राहणार आहे. त्यामुळे हा पेच आता कॉंग्रेस श्रेष्ठी कसा सोडवणार हा आता रंजकतेच्या पातळीवर पोहोचलेला प्रश्‍न आहे. ते काहीही असले तरी पुण्यात कॉंग्रेसची पुरती शोभा झाली आहे हे आजच्या घडीचे चित्र आहे. जिथे त्यांना चांगली लढत देता येणे शक्‍य होते तिथे कॉंग्रेस श्रेष्ठींनी स्वतःच्या हाताने ही शोभा करून घेतली आहे. मुळात ज्यांना मोदींच्या आणि आक्रमक भाजपच्या विरोधात लढायचे आहे त्यांना जर उमेदवारच शोधण्यात इतका विलंब लागणार असेल तर कॉंग्रेसचे एकूणच काही खरे नाही !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.