पुणे – पारंपरिक सिगारेटबरोबरच अनेक तरुणांकडून इलेक्ट्रॉनिक्स सिगारेटला पसंती दिली जाते. मात्र महाविद्यालयांच्या परिसरात ई-सिगारेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालय परिसरात ई-सिगारेटची विक्री व त्याचा उपयोग केला जाणार नाही, त्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिली आहेत.
ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि वापरावर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहेत. त्यासाठी 2019 मध्ये अधिनियमही करण्यात आला आहे. मात्र ऑनलाइन संकेतस्थळे, स्थानिक दुकानदारांकडे ई-सिगारेट उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ई- सिगारेट महाविद्यालयांच्या परिसरात विकली जात असल्याने विद्यार्थी व्यसनांच्या जाळ्यात ओढले जातात. या पार्श्वभूमीवर ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले होते.
त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री आणि उपयोग होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावा, असेही उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनीही स्पष्ट केले आहे.
शिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या विक्रीवरही निर्बंध लावली जाणार आहेत. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक सिगारेटस् प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून संबंधित उपकरणांची, तत्सम पदार्थांची विद्यापीठ, महाविद्यालये, संस्था यांच्या परिसरात विक्री, उपयोग केला जाणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.