पुणे – पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर मांजरी उपबाजारात स्वस्तात शेतमाल घेऊन तेथेच तो चढ्याभावाने विक्री करणाऱ्या खोती आणि दुबार शेतमाल विक्रीला बंदी घातली. दुसरीकडे काही संचालकांच्या वसुलीदार माणसांनी चक्क ‘गुगल पे’वरून हफ्ते घेऊन दुबार शेतमाल विक्री सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे हफ्ते घेण्याचा प्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बाजार समितीवर पुन्हा प्रशासकच नेमण्यात यावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
पुणे बाजार समितीचा मांजरी बाजार हा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या बाजारात खोतीवर स्वस्तात माल घेऊन तेथेच तो चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांची साखळी निर्माण झाली होती. या बाजारात हवेली तालुक्यासह इंदापूर, बारामती, पुणे, पुरंदर, दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खुटबाव, केडगाव, वाखारी, खोर, भांडगाव, यवत, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, नांदूर, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, ताम्हाणवाडीसह नगर रस्त्यावरील शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात विक्रीस येतो.
बाजार समितीवर संचालक मंडळ निवडून आल्यानंतर मांजरी बाजारातील प्रकाराबाबत अनेक तक्रारी सुरू झाल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मारक असलेली खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक मंडळाने घेतला. त्याची तातडीने काटेकोर अंमलबजावणीही सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला. मात्र, यामध्ये काही संचालकांच्या वसुलीदारांनी थेट हफ्ते घेत दुबार विक्री सुरू ठेवली. त्यामुळे संचालक मंडळाच्या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
‘गुगल पे’वर पैसे आणि चॅटिंग…
संचालक मंडळाच्या काही वसुलीदारांनी चक्क ‘गुगल पे’वरून हफ्ते घेण्यास सुरुवात केली होती. एखाद्याने वेळेत हफ्ता न दिल्यास संबंधितांची दुबार विक्री बंद केली जात होती. ‘गुगल पे’वरून पैसे दिल्याचे स्क्रीनशॉट बाजारात व्हायरल झाले आहेत. तसेच, याबाबतचे चॅटिंगही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
“‘गुगल पे’वरून पैसे घेतल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या होत्या. त्यानंतर खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी हा प्रकार घडलेला आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.” – दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे