लक्षणे असलेल्यांवर “वॉच’; परिसरात औषध फवारणी
येरवडा भागातील आणखी सात जणांच्या रक्ताचे नमुने “एनआयव्ही’कडे
पुणे – येरवडा परिसरात “झिका रुग्ण’ सापडताच मनपा आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सुरवातीला “झिका’बाधिताच्या घरातील पाच जणांच्या रक्ताचे नमुने “एनआयव्ही’कडे पाठवले असून, आणखी सात जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत.
याबाबत मनपा सहायक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली. येरवडा परिसरातील 64 वर्षीय महिला केरळ येथे पर्यटनासाठी गेली होती. पुण्यात आल्यावर ताप आल्यामुळे तिच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यावर दि. 11 नोव्हेंबर रोजी ती “झिका’ बाधित असल्याचा अहवाल आला.
त्यानंतर राज्य आरोग्य विभागासह पुणे मनपा आरोग्य विभागाने तत्काळ येरवडा परिसरात सर्वेक्षणाला सुरवात केली. विशेषत: गर्भवतींना कोणती लक्षणे दिसत नाही ना, याची वेळोवेळी तपासणी केली जात आहे.
दरम्यान, संबंधित बाधित महिलेच्या कुटुंबातील पाच जणांच्या रक्त तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींवर लक्ष असून, परिसरात औषध फवारणीही केल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.