पुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने!

महापालिका करणार नियम : धोरण तयार करून स्थायीपुढे ठेवणार, परवानाही आवश्‍यक

पुणे – कुत्रे पाळण्याच्या परवान्याबरोबरच ते किती पाळावेत, याचेही नियम महापालिका करणार असून, आरोग्य विभागाकडून यासंबंधी धोरणच तयार होणार आहे. छोट्या जागेत या प्राण्यांना ठेवून त्यांची हेळसांड केल्याबद्दल पाळीवप्राणी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास रोखण्यासाठी महापालिका प्राणी पाळण्याबाबत नियम निश्‍चित करणार आहे. लवकरच यासंबंधीचे धोरण स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

शेत, बंगल्यांमध्ये संरक्षणाच्या दृष्टीने पाळीव प्राणी पाळण्याबरोबरच आता शहरात हौस म्हणून फ्लॅटमध्ये प्राणी पाळणे ही फॅशन झाली आहे. मात्र, अनेकदा ही फॅशन शेजाऱ्यांना, सोसायटीतील अन्य सदस्यांना त्रासदायक ठरते. प्राणी पाळण्याबाबत महापालिकेकडे कोणतेच धोरण अस्तित्त्वात नाही. त्यामुळे कोणाची तक्रार आली तर कारवाई करणे महापालिकेला शक्‍य होत नाही. त्यामुळे यासंबंधीचे धोरण ठरवले आणि त्याला स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेतल्यास त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे.

शहरामध्ये पाळीव प्राण्याची प्रामुख्याने कुत्रा, मांजर सारखे प्राणी पाळणाऱ्या पुणेकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शहरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी वैयक्तिकरित्या पाळले जातात, याबाबत या प्राण्याचे पालनपोषण करताना नागरिकांनी किती प्राणी पाळावेत, याचे काहीही नियम सध्या अस्तित्वात नाहीत. गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागांत वस्तीभाग, अपार्टमेंट, सोसायट्या, बंगले येथे एक-दोनपेक्षा अधिक पाळीव प्राणी असणारी शेकडो कुटुंबे आहेत. परंतु, या प्राण्यांच्या स्वच्छता, आवाज, भुंकण्याबाबत अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, महापालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे. या पाळीव प्राण्यांवरून शहरामध्ये काही सोसायट्यांत मोठे वाददेखील निर्माण झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांवरून मारहाण करण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. परंतु, याबाबत सध्या कोणतीही नियमावली नसल्याने कारवाई करताना अडचणी येतात. त्यामुळे वैयक्तिकरित्या किती आणि कोणते प्राणी पाळावेत, याबाबात स्वतंत्र धोरण आणि नियमावली बनवण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्याचा ठराव महिला बालकल्याण समितीने मंजूर केला आहे.

या बाबींचा धोरणात असेल समावेश

500 चौरस फूट घरात एक कुत्रा किंवा मांजर पाळता येणार आहे. तसेच त्यापेक्षा मोठ्या घरात 1 कुत्रा आणि 1 मांजर किंवा 2 कुत्रे आणि मांजर, तर रो हाऊसमध्ये 2 कुत्री 1 मांजर अथवा 3 कुत्री पाळता येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.