महाबळेश्वर (प्रतिनिधी) – महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी चौक येथून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी नगरसेवक कुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक किसनशेठ शिंदे, संदीप साळुंखे, गटशिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी आनंद पळसे आदीसह शहरातील शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक आदीसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण सभापती कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून यंदा या स्पर्धांचे क्रीडा महोत्सवात रूपांतर झाले आहे. या महोत्सवात शहरातील अकरा शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. द क्लबच्या गोल्फ मैदानामध्ये झालेल्या या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात रनिंग, गोळा फेक, कब्बडी, खो – खो,रिले, रस्सीखेचसारख्या सांघिक खेळांचा सहभाग होता. प्राथमिक, उच्चमाध्यमिक व महाविद्यालयीन असे तीन गट करण्यात आले होते.
अंजुमन हायस्कूलच्या बॅंड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडाज्योत मुख्य बाजारपेठ मार्गे सुभाष चौक, एसटी स्थानक, पंचायत समितीमार्गे द क्लबच्या गोल्फ मैदानामध्ये नेण्यात आली.नगराध्यक्षांसह मान्यवरांना सर्व शाळांच्यावतीने सलामी देण्यात आली. मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या श्रेया मालुसरे या विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “द क्लब’चे व्यवस्थापक कर्नल अजय दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिक्षण सभापती कुमार शिंदे यांनी या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश विशद करताना विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, या आवडीमधूनच राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच प्रथमच व्यक्तिगत स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून पुढच्या वर्षीचा “क्रीडा महोत्सव’ हा पंधरा दिवसांचा असेल, यामध्ये अनेक खेळांचा समावेश करू असे जाहीर केले.
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, पालिकेच्यावतीने महाबळेश्वर मधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले. यावेळी पालिकेचे आबाजी ढोबळे, बबन जाधव, महाबळेश्वर ट्रेकर्सचे अनिल केळगने, सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे, क्रीडा प्रशिक्षक, मेहुल धायगुडे आदी उपस्थित होते.