पुणे – कामकाजात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना नोटीस बजावली आहे. सात दिवसांत खुलासा समाधानकारक सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जि. प. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची झडती घेतली होती. त्यानंतर सीईओ चव्हाण यांनी कारवाइचा धडाका कायम ठेवत या सर्व प्रलंबित कामास खातेप्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी गायकवाड हेच जबाबदार आहेत. असे दिसून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहेत ठपके?
- विभागीय चौकशीतून प्राप्त अहवालातून कामकाजात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
- कामे वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे कामे प्रलंबित.
- खासगी प्राथमिक शाळांना स्वमान्यता देण्याच्या प्रक्रियेतही दुजाभाव.
- काही शाळांना आॅनलाइन, तर आॅफलाइन स्वमान्यता दिल्या.
- आरटीई प्रवेश व शुल्क प्रतिपूर्तीबाबत योग्य अंमलबजावणी झाली नाही.
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कामात सुधारणा नाही
अजित पवार यांनी शिक्षण विभागातील कामकाजावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही खातेप्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव का सादर करु नये? याबाबत सात दिवसांत खुलासा सादर करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे रमेश चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे.
बाब – प्रलंबित प्रकरणे
१. दैनिक संदर्भ – १६९०
२. वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव – २१०
३. भविष्य निर्वाह निधीची प्रलंबित प्रकरणे – ८९
४. स्थानिक निधी लेखा परीक्षण – ७१५
५. पंचायत राज समिती शक – ७१
६. महालेखापाल शक – ५