देऊळगावराजे – दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची बदली झाली आहे. त्याच्याजागी पोलीस निरीक्षकपदी नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील फोफावलेली गुन्हेगारी, अवैध व्यवसायाला मिळालेली चालना आदी समाजविघातक घटकांना पवार हे चाप लावणार काय, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.
महाडिक यांची जेजुरी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. दौंड येथे नारायण पवार यांची नियुक्ती केली आहे. दौंड तालुक्यात अनेक अवैध धंदे चालत आहेत. यावर मात्र आतापर्यंत वचक ठेवण्यात कोणत्याही अधिकाऱ्यांना यश आले नाही. मध्यतंरी अग्रवाल यांची प्रशिक्षणार्थी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी अवैध धंद्यांवर वचक बसविला होती.
त्यानंतर आतापर्यंत दौंड तालुक्यात कोणत्याही आपला ठसा उमटवता आला नाही. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवार हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी कामगिरी चांगल्या पद्धतीने बजावली होती.
परंतु तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यात त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकाळात झाली होती. काही नागरिक दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.
राजकीय हस्तक्षेप, सर्वसामान्य हतबल
दौंड तालुक्यात राजकीय क्षेत्र कमालीचे संवेदनशील बनले आहे. गेल्या 20 वर्षांत कुल- थोरात गटात तुल्यबळ समर्थक आहेत. गावपातळीपासून ते लोकसभापर्यंत हा संघर्ष पाच वर्षांत सुरूच असतो. याचा प्रत्यय तालुक्यात येत आहे.
दौंडमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर एकतर राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करावे लागत आहे, अशी दबक्या आवाजात काही अधिकारी चर्चा करीत आहेत. यात दोन गटांतील वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर हस्तक्षेप केला जात असल्याचा सूर उमटत आहे. बऱ्याचवेळा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.