नव्या बाधितांची संख्या पुन्हा वाढतेय…
पुणे – मागील दोन दिवसांपासून शहरातील बाधित संख्या पुन्हा वाढू लागली आहे. तीनशे ते दोनशेपेक्षा कमी असलेली बाधित संख्या पावणेचारशेपर्यंत पोहोचली आहे. त्यातच थंडीच्या आगमनामुळे शहरासह राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. ही लाट वेळीच थोपवायची असेल, तर नागरिकांना आतापासून नियमांचे काटेकोर पालन करावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे. विशेषत: यंदाची दिवाळी घरीच, नातेवाईकांना न बोलावता साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.
पुणे शहरात आज नव्याने 377 बाधित सापडले. मागील चार दिवसांपासून करोनामुक्त बाधितांची संख्याही कमी झाली आहे. आज करोनामुक्त व्यक्तींपेक्षा बाधितांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 240 बाधित करोनामुक्त झाले आहेत. त्याबरोबर शहरातील सक्रिय बाधितांचा आलेख झपाट्याने खाली येत होता. आता हा आलेख काहीसा स्थिर आहे.
रविवारी (दि. 1) दिवसभरात 2 हजार 587 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. सुट्टीचा दिवस असूनही बाधितांची वाढती संख्या चिंता व्यक्त करत आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 5 हजार 732 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 579 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 335 बाधित व्हेंटिलेटर तर 244 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
1 हजार 514 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहर हद्दीतील 17, तर अन्य जिल्ह्यातील 8 जणांचा समावेश आहे.