डाळिंब बागा जोमात : शेतकरी सुखावले
सविंदणे – शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्टा हा डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध आहे. टाकळी हाजी, माळवाडी, कवठे येमाई, मलठण, निमगाव दुडे, म्हसे, वडनेर आदी गावांमध्ये डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबपंढरी म्हणून ओळख असलेल्या टाकळी हाजी गावातील अनेक बागा तोडणीसाठी तयार झाल्या आहेत. व्यापाऱ्यांची जागेवर खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
डाळिंब खरेदीसाठी बांगलादेश, नाशिक, संगमनेर, सांगोला, मुंबई या ठिकाणाहून व्यापारी या भागात येत आहेत. डाळिंब खरेदी सुरू झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये बहार धरलेल्या बागांची योग्य व्यवस्थापनामुळे अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या उन्हाचा सामना करीत शेतकऱ्यांनी निर्यातक्षम प्रतीचे डाळिंब पिकविले आहेत.
100 रुपये किलोचा बाजारभाव
बेट भागात आतापर्यंत शेकडो एकरांवर डाळिंब लागवड झाली आहे. अनेक संकटांना तोंड देत चांगल्या दर्जाचे डाळिंब तयार केले आहे. आजच्या परिस्थितीत तीन ते चार वर्षांच्या झाडांसाठी एकरी 2 ते 2.5 लाख खर्च होतो. आणि उत्पादन साधारणपणे 4 ते 5 लाख रुपये मिळते. आजच्या बाजारभावानुसार आज 100 रुपये किलोचा बाजारभाव डाळिंबाला मिळत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना चांगले दिवस येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.