शेलपिंपळगाव – खेड तालुक्यातील कोयाळी येथील श्री भानोबा देवाच्या यात्रेला बुधवार (दि. 13) पासून सुरुवात झाली. देव दानवांचा युद्ध पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी लाखो भाविक श्री क्षेत्र भानोबाची कोयाळी येथे येत असतात. ही यात्रा शुक्रवार (दि. 15) पर्यंत पार पडणार आहे. तर गुरुवारी (दि. 14) देव-दानव युद्धाचा थरार रंगणार आहे.
पहाटे पासून भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी कुसेगावकरांचे कोयाळी नगरीत आगमन व स्वागत करण्यात आले. दुपारी तीन ते सहा या वेळात देव दानवांचे युद्ध व रात्री नऊ वाजता भानोबा देवाच्या ओव्या गाण्यात आल्या. गुरुवारी (दि 14) सकाळी भानोबा देवाचा पोवाडा, दुपारी देव दानव युद्ध तर शुक्रवारी (दि. 15) सकाळी देवाचा ओलांडा, दुपारी देव आजोळाकडे मार्गस्थ होईल. ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवस कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे व तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसीय यात्रा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्ट कोयाळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभनार आहे. यात्रेदरम्यान आळंदी व चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून दानपेट्या सील
देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्यामधील वाद विवाद सध्या सहायक धर्मादाय आयुक्तांकडे सुरू असल्याने यात्रे काळात पैशांचा कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दानपेट्या सील करण्यात आल्या असून प्रशासकीय निरीक्षक म्हणून पी. एस. आंधळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.