बारामती – तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असलेल्या कारखान्यावर विरोधक कडवे आव्हान उभे करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी पॅनल उभा करण्यात असल्याचे सांगितल्याने ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी कृती समितीचा निर्णय सोमवार होणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. त्यामुळे बारामती, पुरंदर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षभरापासून या कारखान्याच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळाली होती. त्यात करोना महामारीची भर पडली होती. वर्षभरानंतर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने मोर्चेबांधणीला वेग आला आहे दरम्यान, कार्यक्षेत्रात इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू आहे. सभासदांची भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते व सभासदांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. 14) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वानेवाडी येथील कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीस कार्यकर्ते व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संभाजी होळकर तसेच कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी केले आहे.
सोमेश्वरनगर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. कार्यक्षेत्रातील समविचारी लोकांना विचारात घेऊन पॅनलची बांधणी करण्यात येणार आहे. याबाबत कार्यक्षेत्रातील अनेकांशी चर्चा झाली आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी देखील चाचपणी सुरू केली आहे. समविचारी व सर्वपक्षीय विरोधक एकत्र आणत कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभा करणार आहे.
– दिलीप खैरे, माजी सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सोमवार (दि.15) निंबुत येथे बैठकीचे आयोजन केले आहे. शेतकरी कृती समितीच्या सर्व कार्यकर्ते तसेच सभासदांनी बैठकीस उपस्थित राहावे. निवडणुकीसंदर्भातील निर्णय व रणनीती बैठकीत ठरणार आहे.
– सतीश काकडे, प्रमुख, शेतकरी कृती समिती.