हिर्डोशी खोऱ्यात शाळकरी मुलांकडून सुट्टीत कुटुंबाला हातभार
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील भोर-महाड रस्त्यावरील हिर्डोशी येथे शाळा शिकत असलेली लहान मुले रस्त्यावर डोंगराची काळी मैना अर्थात करवंदे विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आपल्या शाळेचा खर्च भागवताना दिसत आहेत.
हिर्डोशी धामणदेववाडी येथील शाळेत जाणारी मुले-मुली पहाटे उठून रानातून करवंदे तोडून आणून ती भर उन्हाळ्याच्या दिवसात महाड रस्त्यावर दिवसभर विकताना दिसत आहेत. हातात करवंदाची वाटी (द्रोण) घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून येणाऱ्या गाडीकडे लक्ष ठेवून गाडी आलेली पाहताच हातातील करवंदे त्या गाडीवाल्याला दाखवत ‘करवंदे घ्या करवंदे, डोंगरची काळी मैना, करवंदे घ्या’ असे मोठ्या आवाजात करवंदे विकण्याचा प्रयत्न करतात. त्यात गाडी थांबलीच तर त्या गाडीतील लोकांना करवंदे घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करावा लागत असतो. मग त्यात ऊन किती लागते याचे भान पण या मुला मुलींना राहत नाही.
राहत्या घरापासून दिड किमी अंतरावर असणाऱ्या भोर-महाड रस्त्यावर करवंदे विकण्यासाठी आलेली मुलं घरातून निघतानाच भाकरी- चटणी, भाजी आणि पाणी घेऊन येत असतात. वेळ मिळेल त्यावेळी झाडाखाली बसून आलेली गाडी निघून जाईल म्हणून एकोरी एकोरी आणलेली भाकरी खात असतात.
साधारण 20-25 मुलं असल्याने एका जागेवर सगळ्यांची विक्री हात नाही. ठराविक वेगवेगळ्या ठिकाणी पाच-सहा जणांचा ग्रुप करुन सावलीसाठी एखाद्या झाडाचा आसरा घेत करवंदे विक्रीचे ठिय्या केले आहेत. गेली दोन वर्षे करोना मुळे करवंदे विक्री झाली नसल्याने येथील शाळकरी मुलांचा सुट्टीच्या दिवसात करवंदे विक्रीतून मिळणारे उत्पन्न बुडाले होते. या वर्षी करोना नसला तरी अतिवृष्टी मुळे रस्त्याच्या नुकसानी मुळे रस्ता मान्यता प्राप्त वाहतुकिस खुला नसल्याने एसटी सेवा तर बंदच आहे; परंतु इतर वाहनांची वर्दळ कमी असल्याने या मुलांना करवंदे विकताना गाडीची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते.
सुट्टीत रोजगार
शाळा सुरु होईपर्यंत रोजच्या कमाईतून मिळालेल्या पैशाचा वापर शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तके, ड्रेस, फी यासाठी करत असल्याने या दुर्गम भागातील होतकरु, कष्टाळू मुलं अप्रत्यक्ष आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावताना दिसत आहेत.