54 फाट्याला पाणी सोडा ः निमसाखर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
निमसाखर – येथील नीरा डावा कालव्या वरील 54 फाटा कालव्याचे आवर्तन लांबले असल्याने याअंतर्गत येणाऱ्या निमसाखर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी परिसरातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात पिकांना बसत आहेत. अशातच उन्हाळी आवर्तन जवळपास 15 ते 20 दिवसांनी लांबल्याने शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. 59 फाट्याला पाणी सुटून 40 दिवस उलटले आहेत. त्यानंतर 58 व 55 फाट्यावरील ही आवर्तने झाली आहेत.
त्यामुळे आता तरी आपल्याला पाणी मिळेल अशी अपेक्षा 54 फाट्यावरील शेतकरी वर्गात होती. मात्र 55 नंतर 54 फाट्याला पाणी येणे अपेक्षित असताना 54 फाट्याचे आर्वतन मध्ये तसेच ठेवून 53चे आर्वतन सुरू केले असल्याने 54 फाट्यावरील शेतकऱ्यांनमध्ये सापत्नीक वागणूक दिली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
वास्तविक पाहता 54 फाट्यावरील आर्वतन हे 30 एप्रिल ते 3 मेपर्यंत सुटणे आवश्यक होते; मात्र जवळपास वीस दिवस आवर्तनाला उशीर झाल्याने ऊस पिकासह इतर पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी या गावातील बहुतांश शेती ही 54 फाट्यावरील आवर्तनावर अवलंबून आहे. आवर्तन लांबल्याने परिसरातील पिके जळून चालली आहेत. त्यामुळे याची दखल संबंधित खात्याने घेऊन 54 फाट्यावरील शेतकऱ्यांच्या आवर्तनाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा.
– पप्पू पाटील, सामाजिक कार्यकर्ते निमसाखर
प्रत्येक वेळी इंदापुर तालुक्यातील 54 फाट्यावरील निमसाखर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत दुजाभावाची भुमिका घेतली जात आहे. ही अन्यायकारक भूमिका संबंधित विभागाने न घेता 54 फाट्यावरील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे.
– रविंद्र पवार, युवा शेतकरी
सध्या शेतीमध्ये ऊस, भुईमूग यांसह कडवळ यांसारखी चारा पिके आहेत. मात्र फाट्याला येणारे पाणी लांबले असल्याने पिके जळून चालली आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत असून, दुग्धव्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. ओल्या चाऱ्याच्या समस्येमुळे दूध उत्पादन कमी प्रमाणात होत आहे.
– उमेश रणवरे, दूध उत्पादक शेतकरी
यावेळी रोटेशन सुरू होण्यास उशीर झाल्याने पाणी सोडण्यासाठी उशीर झाला आहे. दोन दिवसांत 54 फाट्याला पाणी सोडण्यात येणार आहे.
– अश्विन पवार,उपपिवभागीय अभियंता बारामती