ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
नीरा – संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष वेधलेल्या गुळूंचे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदासाठीच्या उमेदवार सम्राज्ञी कौस्तुभ निगडे यांनी ग्रामसमृद्धी पॅनलच्या निर्मला उत्तमराव निगडे यांचा पराभव केला आहे. विरोधकांनी अजित निगडे यांच्या ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलसमोर मोठ आव्हान निर्माण केलं होत.मात्र निगडे यांनी विरोधकांना धूळ चारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सभापती व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अजित निगडे यांनी केले तर नारायण निगडे यांची त्यांना साथ मिळाली. विरोधी ग्रामसमृद्धी पॅनलचे नेतृत्व सुरेश जगताप यांनी केले. ही निवडणूक महिलांसाठी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची ही पावतीच असल्याचे मत सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे यांनी व्यक्त केले.
विजयी उमेदवार
वॉर्ड एक : दीपक निगडे, आनंद कर्णवर, शीतल निगडे, हेमलता दे. वॉर्ड दोन : तानाजी निगडे, कविता निगडे, ज्ञानेश्वर पाटोळे. वार्ड तीन : आरती निगडे, वैशाली फरांदे, अमृता निगडे
माजी सभापतींच्या सूनबाई झाल्या सरपंच
पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अजित निगडे यांच्या सुनबाई सम्राज्ञी कौस्तुभ निगडे या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी उभ्या होत्या. त्यामुळे अजित निगडे यांची प्रतिष्ठा कोणाला लागली होती. विरोधकांनी निगडे यांच्या सूनबाईचा पराभव करण्यासाठी मोठी ताकद लावली होती; मात्र 25 वर्षे ज्यांच्या घरात पुरंदर पंचायत समितीचे सभापतीपद होत, त्या अजित निगडे यांना शह देण्यात विरोधकांना यश आले नाही. याउलट त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.