उमेदवारीसाठी सर्वपक्षीय इच्छुकांची लगबग सुरू
इच्छुकांची भाऊगर्दी होणार असल्याची गावागावांत चर्चा
विजय शिंदे
वडापुरी – इंदापूर तालुक्यातील माळवाडी – वडापुरी जिल्हा परिषद गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी काट्याची लढत होणार आहे. हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या जरी कमी असली तरी, युवक विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुकांनी आरक्षण जाहीर झाल्यापासून छुप्या प्रचाराला गती दिली आहे.
गटातील माळवाडी गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, इतर पक्ष व अपक्ष इच्छुकांची भाऊगर्दी होणार असल्याची चर्चा सध्या गावागावांत रंगली आहे. तर वडापुरी गण सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. त्या गणातही भाजप, राष्ट्रवादी सोबतच इतर पक्षाच्या इच्छुकांची उमेदवारीसाठी लगबग सुरू झाली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 2 गट, तर पंचायत समितीच्या 4 गणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात 9 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती सदस्य असणार आहेत. इंदापूर तालुक्याचे राजकारण माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती कायम फिरत असते. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने अगदी छोट्या निवडणुकाही ताकदीने लढवल्या जातात, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही चुरशीने होणार, हे निश्चित आहे.
माळवाडी – वडापुरी जिल्हा परिषद गटासाठी भाजपमधून उमेदवारी मिळावी. यासाठी भारतीय जनता पक्षातील अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पळसदेव, बिजवडी गटातील काही गावे माळवाडी गणात आल्याने नवनिर्वाचितांसह जुन्या इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार या गटातील अनेकांनी गावागावांतील विविध कार्यक्रम, वाढदिवस आदी कार्यक्रमाला हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. परंतु आगामी निवडणुकीसाठी या गट, गणांची धुरा कोणाकडे जाणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
अडगळीतील नेते होणार सक्रिय
गेल्या दोन वर्षांत करोनाची झळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालये कमी पडत होती. असे असताना त्या काळात कोणता नेता रुग्णालय किंवा त्या रुग्णांच्या सुखदु:खात सहभागी होता, हे मतदारांच्या चांगले लक्षात राहिले आहे. मात्र, आता निवडणुका आल्याने अडगळीत पडलेले राजकीय नेते सक्रिय होताना दिसत आहेत.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून माळवाडी – वडापुरी जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या जास्त आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ज्यांना संधी देईल त्यांचे सर्वजण मिळून काम करतील.
– सतीश पांढरे, सदस्य पंचायत समिती इंदापूर
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली माळवाडी – वडापुरी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलणार आहे. विधानसभा निवडणुकीचे मताधिक्य पाहता हा गट कायमच हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचा राहिला असल्याचे दिसून येते. इच्छुकांची संख्या अधिक आहे. परंतु पक्ष देईल तो उमेदवार या ठिकाणी विजयी होईल, याची खात्री आहे.
– रवींद्र सरडे, संचालक कर्मयोगी साखर कारखाना इंदापूर