मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शेतकरी गणेश अनंतराव खानदेशे यांच्या गोठ्यातील राणी नावाच्या गायीची खरेदी उच्चांकी भावाने 1 लाख 31 हजार 111 रुपयांना अकोले तालुक्यातील शेतकऱ्याने केली. गायीने उच्चांकी पद्धतीने दिलेल्या दुधाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. दररोज दोन वेळेस 25 लिटर दूध देत आहे. या गायीची शरीरयष्टी आणि इतर बाबींची सोशल मिडीयावरून जोरदार कौतुक होत आहे.
महाराष्ट्रात आपल्या वातावरणात तयार झालेली एबीएसची जास्त दूध देणारी गाय असल्याने दुधाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना देखील या सर्वगुणसंपन्न आंबेगावच्या राणी गायीची उच्चांकी भावाने 1 लाख 31 हजार 111 रुपयांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे प्रगतशील शेतकरी विश्वास रकटे पाटील यांनी मंचर येथून खरेदी केली. यावेळी वाघापूर येथील दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब औटी, संगमनेर येथील युवा उद्योजक रवी हासे, खेड तालुक्यातील उद्योजक पै. वैभव पोकळे पाटील, राहूल शेटे आदी उपस्थित होते.
असे केले संगोपन
खानदेशे यांनी पंजाबमधून 80 हजारांना ही गाय खरेदी केली होती. तिला इकडे आल्यानंतर एबीएस ब्रीडची कालवड झाली. तिचे नाव राणी ठेवले, राणीला 15 दिवसांनी स्टार्टर खाद्य सहा महिने दिले. दरम्यान, सहावेळा जंताचे डोस दिले. पुढे भुसा, कडधान्य चुनी, कांडी, सरकी पेंड, मिनरल मिक्चर रतीब म्हणून देण्यात आले. त्यासोबत मका, मूरघास, गवत घास, कडबा चारा दिला. कालवड 14 महिन्यांची झाल्यानंतर सिमेन भरण्यात आले. 23 महिने वय पूर्ण झाल्यानंतर साडेपाचशे किलोच्या या राणी गायीने 80 किलो वजनाच्या कालवडीला जन्म दिला.