दावडी – खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथील चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “सेव्ह गर्ल’, “सेव्ह वाईल्ड लाईफ’, “सेव्ह वॉटर’, “सेव्ह अर्थ’ आदी फलक हाती धरून सामाजिक समस्येची जाणीव करून दिली.
यावेळी दिंडीमध्ये संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई या संतांच्या वेशभूषेतील बालवारकरी, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या नऊवारी साडीतील विद्यार्थिनी, सजवलेली पालखी, आकर्षक अबदागिरी, बाजूने भालदार चोपदार, पालखीच्या मागे पुढे भगव्या पताका हे सर्व पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पालखीचे पूजन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. के. डी. चौधरी पाटील व सचिव आशालता चौधरी पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर तल्लीन होऊन वारकरी झेंडे उंचावत आकर्षक नृत्य केले. दिंडीमध्ये बालवारकऱ्यांचा भव्य रिंगण सोहळा व रिंगणात धावणारा अश्व सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकामधील “रेड्यामुखी वेद’, “गोरा कुंभाराच्या भक्तीने मुलास जीवदान’, “विठ्ठल जनाबाईचे दळण’ व ज्ञानेश्वरांनी चालवलेली निर्जीव भिंत यांनी असंख्य पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थी सहभागातून तयार केलेल्या “विठू माऊली’ या शब्दकृतीने पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. स्कूलच्या आषाढी दिंडीने प्रत्यक्ष वारीची अनुभूती दिली.