70 रुपयांचा पासही द्या
जुन्नर/नारायणगाव – भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएल बस सेवा व ग्रामीण हद्दीतील एक दिवसीय 70 रुपयांचा पास पुन्हा सुरू करण्याची मागणी अतुल बेनके यांनी केली आहे. तसे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन देण्यात आले आहे.
आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात भोसरी ते जुन्नर ही बससेवा सुरू करण्यात आली होती; परंतु 7 ऑगस्टपासून बससेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. शिवभक्त, पर्यटक, नागरिक व विद्यार्थी यांच्याकडून भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएल बस सुरू करावी, अशी मागणी सातत्याने आमदार अतुल बेनके यांच्याकडे करण्यात येत होती.
पीएमपीएमएलचा बसचा सर्व मार्गांवरील ग्रामीण हद्दीतील एक दिवसीय 70 रुपयांचा पास गेल्या दीड महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. हा पास सुरू करण्याबाबत ग्रामीण भागासह पुणे शहरातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर आग्रही आहे. तरी ग्रामीण हद्दीतील 70 रुपयांचा एक दिवसीय पास तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे व्यवस्थापकीय संचालकांकडे केली असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.