वीसगाव खोरे – नवरात्रौत्सव आणि दसऱ्यामध्ये मागणीपेक्षा झेंडूची आवक वाढल्याने या फुलांचा दर 10 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकला गेला, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते; परंतु दिवाळीत हवामानातील बदलामुळे फुलांच्या बहरण्याचा हंगाम लवकर संपत आल्याने आणि त्यामुळे फुलांची आवक कमी झाल्याने फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. सध्या झेंडूला 80 ते 100 रुपये किलो प्रतवारीप्रमाणे भाव मिळत आहे.
भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात मांढरदेवी रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. कमी दिवसांत, कमी खर्चात, कमी त्रासात; पण खात्रीने फुले देणारे झेंडूचे पीक आहे. दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. उन्हाळ्यात, लग्नसराईत इतर फुले दुर्मिळ असताना झेंडूच्या फुलांना मागणी वाढते. नवरात्र, दसरा, दिवाळीसह सण-उत्सवाला फुलाला चांगली मागणी मिळून चार पैसे हाती येतील, या आशेने झेंडू फुलशेती केली जाते.
यंदा दसऱ्याला दर मिळाला नाही; परंतु दिवाळीत चांगला दर मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अर्धा एकर क्षेत्रात झेंडूची शेती केली आहे. दिवाळीत फुलांना चांगली मागणी असल्याने गुलटेकडी पुणे मार्केटला गेल्या दोन दिवसांत 80 ते 100 रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने दसऱ्यात झालेलं नुकसान भरून निघण्यास मदत झाली.
पावसाचा फटका
वीसगाव खोऱ्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. उपलब्ध फुले पावसाच्या भीतीने बाजारात विक्रीस आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते आहे. दिवाळीत झेंडूच्या फुलांना मागणी जास्त असते त्या तुलनेत फुले उपलब्ध नसल्याने चढ्या भावाने फुलांची विक्री होत आहे.