पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उपनेते तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नजरचुकीने छापले गेले आहे. याबाबत पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत कारवाई मागे घेतली आहे, त्यामुळे आपण आता नाराज न होता पक्षाचे काम जोमाने करावे. ते आपण करत आहातच; पण आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिरूरचा दौरा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंगळवारी (दि. 5 जुलै) शिवसेना भवन येथे भेटीसाठी बोलविले होते. त्यानुसार आढळराव पाटील व जिल्हा प्रमुख शरद सोनवणे भेटीला गेले होते. करोना संकट आणि निसर्ग चक्रीवादळाच्या संकट काळातही आढळराव पाटील सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध होते, ही सच्च्या शिवसैनिकाची ओळख आहे.
सध्या शिवसेनेवर आलेले हे संकट पण जाईल, आपल्या सारख्या शिवसैनिकांचा बळावरच शिवसेना खंबीरपणे पुन्हा उभारी घेईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीसोबत युती नकोच : सोनवणे
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधून बाहेर पडत, स्वबळावर निवडणुका लढवावी. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढू. जेवढे उमेदवार येतील तेवढे येतील, असे गाऱ्हाणे बैठकीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी मांडले.