रेडा-इंदापूर प्रशासकीय भवनसमोर आश्रमशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली (दि.5) सप्टेंबरपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिवांनी अनुदान वितरित करण्याचे आदेश दिल्याने मखरे यांच्या आंदोलनास यश मिळाले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत सुरू असलेल्या व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित भटक्या जमातीच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळासाठीचे परिपोषण अनुदान व वेतनेत्तर अनुदानाची प्रलंबित देयके वितरित करण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिल्याचे पत्र उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभागाने काढले आहे. उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 25 टक्के निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे.
मखरे म्हणाले की, मी परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आमच्या बाजूने आमचे वकील ऍड. बाळासाहेब देशमुख यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासमोर बाजू मांडताना प्रलंबित परिपोषण आहार अनुदान त्वरित मिळावे, ही बाब निदर्शनास आणून दिली.
त्यामुळे शासनास परिपोषण व वेतनेत्तर अनुदानाचे आदेश पारित करणे भाग पडत आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“प्रभात’कडून सातत्याने पाठपुरावा
दैनिक प्रभातने इंदापूर तहसील कार्यालयासमोर आश्रमशाळा संदर्भातील विविध मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाचे सातत्याने वार्तांकन केले होते. प्रभातच्या माध्यमातून हा प्रश्न थेट सरकार दरबारी पोहोचविला होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या. त्यामुळे आंदोलकांनी “प्रभात’चे आभार मानले आहे.