हितेंद्र गांधी
जुन्नर – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या 30 ते 40 समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस युतीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथही देण्यात आली असून त्यांच्यासोबतच्या नऊ आमदारांना मंत्रीपदाची शपथ ही देण्यात आली आहे. राज्य पातळीवर होणाऱ्या या वेगवान घडामोडींमुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये खळबळ उडाली आहे.
विविध पक्षांचे नेते संभ्रमात असले तरी खरं टेन्शन कार्यकर्त्यांनाच आले आहे. जुन्नर तालुक्यात भविष्यातील आमदार कोण असेल, जिल्हा परिषद परिषदेची जागा कोणत्या पक्षाला मिळेल, नगरपालिकेत तिकीट वाटप कसे होईल आदी विविध निवडणुकींचे नियोजन हे कार्यकर्ते आत्तापासून करायला लागले आहेत. व्हॉट्सऍप ग्रुपवर तसेच विविध सोशल माध्यमातून अशा चर्चा जोरदार सुरू आहेत.
जुन्नर तालुक्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अतुल बेनके हे आमदार असून माजी आमदार शरद सोनवणे हे शिंदे गटात यापूर्वीच सामील झाले आहेत. तर पूर्वी शिवसेनेतून चारवेळा जिल्हा परिषद जिंकणाऱ्या आशा बुचके यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला आहे. तर पूर्वीच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी ठाकरें सोबतच राहणे पसंत केले आहे. दरम्यान, लवकरच पुन्हा एकदा अशीच उलथापालत होणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अटकळ
राजकीय उलथापालथीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. तालुक्याचे आमदार बेनके हे राजभवनात असल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती झाल्यामुळे तालुक्यात काय परिस्थिती राहील, या विषयावर समाजमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी जल्लोष करताना दिसत होते. त्यांच्या मते अजित पवार जुन्नरचे तिकीट हे पुन्हा एकदा बेनके यांना मिळवून देतीलच, अशी अटकळ बांधली जात आहे.
“त्यांची’ भाजपसोबत गट्टी, खंडागळेंना संधी
माजी आमदार शरद सोनवणे यांना शिंदे गटाकडून आमदारकी नक्की मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यांनी तालुक्यासाठी मोठा निधी आणला असून त्यांची भाजप नेत्यांशीही चांगली गट्टी असल्याचे कार्यकर्ते सांगतात. मात्र वरील तीनही पक्षांची राज्यात युती झाल्यामुळे तालुक्यात तिकीट नक्की कोणाला मिळेल, याबाबत सम्रावस्था आहे हे मात्र नक्की. दरम्यान, ठाकरे गटातील माऊली खंडागळे यांना मोठी संधी मिळणार, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
भाजपच्या गोटात जयजयकार
भाजप गोटात देवेंद्र फडणवीस यांचा जयजयकार सुरू होता. आशा बुचके यांनी गेल्या वर्षभरात जोरदार पक्ष बांधणी केली असून त्यांनाच आमदारकी मिळणार असल्याचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात.
कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुगलबंदी
राजकीय पातळीवर या वेगवान उलथापालथीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुगलबंदी पहावयास मिळाली. अकेला देवेंद्र क्या करेंगा – देखा ना, आता मोदींवर टीका कसे करणार, परवा शरद पवार म्हणाले देवेंद्रवासी, त्याचा अर्थ कळाला का?, काय करतोस रे – सतरंज्या उचलतोय, पण कोणाच्या तेच कळत नाही दादा आदी मीमम्स् व्हायरल होत असून कार्यकर्त्यांना टाइमपास करण्यासाठी एक खाद्य मिळाले आहे.