पेरणेत नियोजनाचा आढावा
शिक्रापूर – एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त पातळीवर दोन महिन्यांपासून नियोजन सुरु असून अनेक बैठका झालेल्या आहेत. सर्व विभागांचा योग्य समन्वय रहावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, डॉ. संजय शिंदे, वाहतूक शाखा उपायुक्त विजय मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महानगर प्रादेशिक परिवहन आयुक्त ओमप्रकाश बकोडीया, बार्टी संस्थेचे विभागप्रमुख सत्येंद्रनाथ चव्हाण, स्नेहल भोसले, प्रांताधिकारी संजय असवले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांकडून त्यांच्या नियोजनाबाबत आढावा घेत अनेक ठिकाणच्या पार्किंगची देखील पाहणी केली आहे, दरम्यान, यावेळी बोलताना मागील वर्षीच्या तुलनेत जास्त अनुयायी येतील हे गृहीत धरून बसेस, बंदोबस्तासह आदी सुविधा व संख्या वाढवत आहे. सध्या पार्किंग देखील जास्त बनवलेली आहे. पोलीस विभागाच्या माहितीनुसार मागील वर्षी पेक्षा वीस टक्के अनुयायी जास्त येतील, असे गृहीत धरून नियोजन सुरु आहे. कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.