रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची शिरूर पोलिसांकडे निवेदन
सविंदणे : शिरुर तालुक्यात अनेक माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी अनेक मुली तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्या मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात त्या मुलींना अनेक अडचणी असतात.
तसेच त्यांची छेडछाडही केली जाते किंवा त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये मुलींसाठी तक्रारपेटी बसवावी, अशी मागणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना निवेदन दिले आहे.
शिरुर तालुक्यातील शाळेत आणि कॉलेजमध्ये सध्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. बदनामी होईल या भीतीने मुली या गोष्टी कोणालाच सांगत नाहीत.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या राणी कर्डिले, शोभना पाचंगे, पत्रकार किरण पिंगळे, डॉ. वैशाली साखरे, सुवर्णा सोनवणे, राणी शिंदे, दीपाली आंबरे, प्रियांका बंडगर आदी महिला उपस्थित होत्या.