पुणे -जिल्ह्यातील करोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी बाधित रुग्णांना नंतर उपचार देण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात “पोस्ट कोविड सेंटर’च्या सुविधेचा अभाव असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातून क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सर्वसाधारण सभेची बैठक पार पडली. त्यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण विभाग सभापती सारिका पानसरे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांना आजार झाल्यानंतर, पुन्हा आजार होण्याची शक्यता असू शकते. असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले नाही. त्यामुळे त्या रुग्णाला पुन्हा पोस्ट कोविड उपचाराची गरज निर्माण झाली आहे. परंतु, पोस्ट कोविडची जिल्ह्यात सुविधा नाही. परिणामी रुग्णांचे उपचाराभवी मृत्यू होत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत, अशी माहिती बुट्टे पाटील यांनी सभागृहात दिली.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, सध्या रुग्ण कमी असल्याने त्यांना काम नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पोस्ट कोविड रुग्णांची माहिती गोळा करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात पोस्ट कोविड सुविधा सुरू करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मध्ये आतापर्यंत आउटसोर्सिंग केलेल्या नाष्टा, जेवण किंवा अन्य सोयी सुविधेंच्या खर्चही कंत्राटदाराना अद्याप बिले देण्यात आली नसल्याचा प्रकार बुट्टे पाटील आणि आशा बुचके यांनी निदर्शनास आणून दिला.
कंत्राटदारांची बिले देणार
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील कंत्राटदारांची बिले देण्यात आली आहेत. ज्यांची बिले राहिली असल्यास ती देण्याची व्यवस्था केली जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड केअर क्लिनिक सुरू करून सेवा दिली जाईल.