आळंदी -अस्तावस्त व्यस्त पहूडलेले भिकारी…बेकार तरूणांची फौज…अस्थी विसर्जन, दशक्रिया विधीमुळे होणारी घाण… भुरटे चोर… पैसे दुप्पट करून देतो म्हणून लाला-काळ्या स्ट्रायकरचा सुरू असलेला धंदा… कुलूपबंद अवस्थेतील पोलीस चौकी… ही अवस्था आहे पवित्र इंद्रायणी नदीवरील घाटाची. त्यामुळे सध्या तरी हा घाट म्हणजे अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डाच बनला आहे.
आळंदी राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. वारकरी मंडळी, यात्रेकरू इंद्रायणी तिरावर स्नानासाठी तसेच दर्शनासाठी सदोदित येतात. मात्र, याठिकाणी स्नानासाठी गेलेल्या भाविकांचे कपडे चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास होतात. जरी मंदिर बंद असले तरी इंद्रायणी नदीत स्नान करून कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत. मात्र, त्यांना या अवैध धंदेवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.
करोना व लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर मंदिर बंद असल्याने येथील व्यवसाय पूर्णपणे थंडावले असल्याने अनेकांना दोनवेळचे जेवणही मिळत नसल्याने दानशुरांनी त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. मात्र, याचा लाभ गरजुंपेक्षा टवाळे घेत आहेत. काहीही न करता दोनवेळाच्या जेवणाची एकाच जागी सोय होत असल्याने घाटावर बेकारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
करोना व अन्यकारणामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अस्ती विसर्जनासाठी व धार्मिक विधीसाठी बहुसंख्य जण इंद्रायणीतीरी येत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत अस्थीविसर्जन केले जाते. अस्थी बरोबर कपडे, निर्माल्य, फोटो नदीत फेकले जातात. घाटावर तर अस्थीविसर्जनामुळे कचरा होतो. पालिका आणि पोलिस यांच्याकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने इंद्रायणी तिरी व नदीत कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
घाटावर 300 पेक्षा अधिक टोळके
घाटावर 300 पेक्षा अधिक बेकार, टवळके कायमच आढलतात. यातील बहुसंख्य जण मद्याच्या आहारी गेलेले असतात. त्यामुळे मद्याचे घोट रिचवल्यावर शिवीगाळ, मारीमारी हे प्रकार नित्याचेच झाले आहे.
इंद्रायणी आणि घाटाचे पावित्र्य राखण्यासाठी…
– बाहेरून येणाऱ्या लोकांचे अस्थी निर्माल्य विसर्जनावर बंदी
– मद्यपी आणि बेकार लोकांना हटविणे
– भिकाऱ्यांसाठी शेल्टर होमची आवश्यकता
– घाटाची नियमित स्वच्छता
– घाटावरील पोलीस चौकी दिवस-रात्र सुरू ठेवणे
– घाटावर बेशिस्त वागणाऱ्यांना सुचित करण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा
– कपडे धुणे आणि वाहने आणण्यास बंदी
– घाटावर येणाऱ्या मार्गावर लोखंडी कुलूपबंद गेट उभारणे