वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे : महाळुंगे पोलीस चौकीचा पदभार स्वीकारला
महाळुंगे इंगळे – तणाव न घेता काम करा, त्याचा आनंद घेता येईल. कामाची पेंडन्सी ठेऊ नका, त्यात खूप समाधान मिळेल, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले.
महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचा निरोप समारंभ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांचा स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
साबळे पुढे म्हणाले, बदली हा प्रशासकीय भाग असल्याने ज्या ठिकाणी जाईल, तेथे प्रामाणिकपणे काम केले की आत्मिक समाधान व त्यातून आनंदही मिळतो. व्यक्ती म्हणून अरविंद पवार खूप भावले. या पोलीस चौकीच्या सुधारणेसाठी त्यांनी लोक सहभागातून पुढाकार घेतला व कायापालट केला, याचा मी साक्षीदार आहे. सर्व कर्मचारी व अधिकारी यांची सहकार्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.
अरविंद पवार म्हणाले, केलेल्या कामाची पोचपावती व वरिष्ठांचा विश्वास यामुळे मला महाळुंगे पोलीस चौकीत काम करण्याची संधी मिळाली. दीड वर्षाच्या कालावधीत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, महिला बैठक व्यवस्था, अंमलदार कक्ष, व्यायाम शाळा, आदी सुविधा लोकसहभागातून करण्यात आल्या. तसेच चौकीसमोर टाइल्स, कॉंक्रीट, मंदिर, बगीचा, लॉन्स, झाडे लावून एक सुंदर चौकी बनविली. औद्योगिक कंपन्यांमधून सीएसआर फंड मिळवून कामे करून चौकीचा कायापालट केला. एचपी चौकात एमआयडीसीकडून अर्धा एकर जागा मिळवली आहे, येथे महाराष्ट्रातील सुसज्ज पोलीस चौकी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, उपनिरीक्षक गायकवाड, चित्तमपल्ले, बांगर, हवालदार राजेंद्र कोनेकर, पोलीस नाईक सांगळे, पोलीस पाटील अमोल पाचपुते व तृप्ती मांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरविंद पवार अनेकदा भावुक झाले. यावेळी मंगल देवकर, सीमा साठे, बेबी कड, सरिता वाघमारे, सुनंदा शिंदे, महाळुंगे गावचे पोलीस पाटील सचिन भोपे, हवालदार संपत मुळे, सर्व गावचे पोलीस पाटील, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
गुन्हे वाढले होते, त्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणले. कर्मचारी व अधिकारी यांच्यावर विश्वास टाकून प्रेमाने अपेक्षेपेक्षा जास्त कामे करून घेतली. एमआयडीसीतील माथाडी, कॉन्ट्रॅक्ट वरून होणारी गुन्हेगारी दहशत मोडून काढली. राजकीय दबावाला बळी न पडता काम केले. अनेक गुन्हगारांवर मोक्का लावले, तडीपार केले.
-अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक