जेजुरीत मुस्लीम बांधवांचे सामाजिक सलोख्याचे दर्शन
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
रविवारी (दि.10) आषाढी एकादशी व बकरी ईद हा सण एकाचदिवशी येत आहे. शुक्रवारी (दि.8) जामा मस्जिदमध्ये जुम्माची नमाज अदा करताना माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, इब्राहिम काझी, नसरुद्दीन सय्यद, अमीर बागवान, समीर मुलाणी,अशपाक पानसरे, कयुम बागवान, सादिक बागवान, रफिक पानसरे, महमूद शेख, इरफान पानसरे, मोहसीन पानसरे आदींसह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाचदिवशी येत असल्याने ईदची कुर्बानी न देता सोमवारी हा कार्यक्रम करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना देण्यात आले. जेजुरी शहर व पंचक्रोशीतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मुस्लीम समाज खंडेरायाचा मानकरी
जेजुरी नगरीतील मुस्लीम समाज हा खंडेरायाचा मानकरी समजला जातो. खंडेरायाच्या पालखी सोहळ्याला पानाचा विडा अर्पण करण्याचा मान आहे. त्यामुळे येथे पानसरे आडनाव प्रचलित आहे. खंडेरायाचा पंचकल्याणी अश्व पानसरे परिवार दान करतो तर त्याची निगा करण्याचा मान खान बंधू यांचा आहे. म्हाळसा-बाणाई यांचा चुड्याचा मान मणेर बंधू यांच्याकडे आहे.
पालखी सोहळ्यापुढे ताशा वाजविण्याची परंपरा मुलाणी बांधव करीत असतात. पालखी सोहळा शहरातील जामा मस्जिद समोरून जाताना फटाक्यांची आतिषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. बहुतांश मुस्लीम बांधव पालखीला खांदा लावतात. तर काही घरांमध्ये श्रींचे चंपाषष्ठीचे घट बसविले जातात. जेजुरीकर ही माझी जात आणि खंडेराया हा माझा धर्म असे येथे अभिमानाने बोलले जाते. त्यामुळेच सामाजिक सलोखा व भाईचारा शेकडो वर्षांपासून नांदत आहे.