शिक्रापूर – शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू असताना या दौऱ्यात हिवरे कुंभार येथील एका आजोबांनी डॉ. कोल्हेंना कोपरीच्या खिशातून आकराशे रुपये काढून देत पुन्हा ताकदीने निवडणूक लढा तुमचा विजय ठरलेला असल्याचे सांगत आशीर्वाद दिला आहे.
हिवरे कुंभार येथील गावच्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी डॉ. कोल्हे आलेले असताना सर्वसामान्य शेतकरी किसन गणपत तांबे कोल्हेंच्या शेजारी जाऊन उभे राहिले. हातात माईक घेऊन खासदार तुम्हाला पहिली निवडणूक आठवते ना, तुम्हाला निवडणूक लढविण्यासाठी अकराशे रुपये दिले होते, अन् आजही आकराशे रुपये देणार आहे. मी कोणाचे पैसे घेत नाही.
तुम्हाला देण्यासाठी वेगळे पैसे ठेवले आहे, तुम्ही शंभर टक्के निवडून येणार हा माझा शब्द आहे, असे म्हणत आजोबांनी कोपरीच्या खिशातून कष्टाचे अकराशे रुपये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केले. दरम्यान डॉ. कोल्हेंनी आजोबांचे चरण स्पर्श करीत आशिर्वाद घेत बोलताना शेतकऱ्यांच्या डॉ. अशा प्रकारच्या शुभेच्छा व आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणूनच मी संसदेत तुमचा आवाज बनून प्रश्न मांडत असल्याचे सांगितले.
२०१९ च्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघातून लोकांनी खिशातील पैसे देऊन निवडणूक लढविण्यासाठी मदत केली होती. यावेळी सुद्धा हिवरे गावचे शेतकरी किसन तांबे यांनी पुन्हा अकराशे रुपये काढून देत आशिर्वाद देऊन पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास दिला.